यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व- स्मृतिसंकलन-३

प्रशस्ती ऐकून जीवनाचं सार्थक झालं !

यशवंतरावांना मी प्रथम पाहिलं ते 'वहिनींच्या बांगड्या'च्या प्रीमियर शोला.  त्यानंतर अनेक मराठी नाटके, मराठी चित्रपट प्रीमियरना यशवंतराव व वेणूताई यांची गाठभेट व्हायची.  दोघेही आवर्जून हौसनं येत, सर्वांचं मनापासून कौतुक करीत.  यशवंरावांचं दिलखुलास मनमोकळं हसणं पाहूनच सर्व कौतुक पोहोचत असे.  वेणूताईंचं कौतुक मात्र अबोल असायचं.  मी लांब असले तरी निरोप पाठवून जवळ बोलावून घेत.  मोजक्या शब्दांत चौकशी करीत आणि तीही घरगुती.

यशवंतरावांचा खर्‍या अर्थानं परिचय झाला तो ते संरक्षणमंत्री झाले तेव्हा. १९६२ च्या चिनी युद्धानंतर मराठी चित्रपट व्यावसायिकांच्यातर्फे महाराष्ट्रातील अनेक शहरी करमणुकीचे कार्यक्रम केले जात.  त्याद्वारे होणारे उत्पन्न संरक्षण निधीला दिले जाई.  यशवंरताव अशा कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहात असत.  आण्णा माडगूळकर यांच्यावर त्यांची मर्जी आणि मैत्रीही.  आण्णांच्या गळ्यात हात टाकून गुजगोष्टी चालायच्या.

याच सुमारास माझी वहिनी अचानक वारली.  संरक्षण निधीला सुवर्णदान करावे असं आवाहन त्या काळात सतत केलं जात होतं.  माझ्या वहिनीचे सर्व दागिने संरक्षणनिधीला द्यावेत असं मी ठरविलं आणि एक दिवस भेटीची वेळ न ठरविता यशवंतरावांचया बंगल्यावर जाऊन हजर झाले.  आत निरोप पाठविताच, पाच मिनिटांचाही वेळ गेला नसेल एवढ्यात सौ. वेणूताई बाहेर आल्या आणि मला घेऊन आत गेल्या.  चहा वगैरे होईपर्यंत यशवंतरावही दिवाणखान्यात आले.  मी ते दागिने त्यांच्याकडे दिले आणि त्यांचा निरोप घेऊन निघाले.  त्यांनी मला थांबवले, आणि विचारले, 'फोटोग्राफर नाही का आणला ?'  मी गोंधळून गेले.  म्हणाले 'फोटोग्राफर कशाला ?'  यावर ते हसले आणि म्हणाले, 'अशा वेळी मराठी माणूस कळतो.'  मग समजावणीच्या सुरात म्हणाले, 'अहो, अशा गोष्टीना प्रसिद्धी मिळाली पाहिजे.  आम्ही कुणी काही करण्यापेक्षा कलावंतांनी केलेल्या कृतीचं आमजनतेकडून अधिक अनुकरण होतं.'  त्यांनी बंगल्यावरल्या फोटोग्राफरला बोलावलं, फोटो घेतला आणि स्मरण ठेवून फोटोच्या प्रती मलाही पाठविल्या.

यशवंतराव त्यावेळी कर्तृत्वाच्या शिखरावर होते.  हिमालयाच्या मदतीस सह्याद्री धावून येईल हा पं. नेहरूना दिलेला शब्द त्यांनी शब्दशः खरा करून दाखविला.  स्वतःचं यशवंत हे नाव सार्थ केलं.  त्यांच्या या विजयी कर्तृत्वानं दिपलेल्या सी. रामचंद्र यांनी दीर्घकाळानंतर त्यांना झालेल्या प्रथम पुत्राचं नामकरण हौसेनं 'यशवंत' असं केलं.

यशवंतराव दिल्लीत आहेत हा एक मोठा दिलासा असायचा.  एकदा एका हिन्दी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिल्लीला गेले होते.  कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था 'अशोका इंटरनॅशनल' या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. पहिली एक-दोन दिवस शूटींग व्यवस्थित पार पडले.  मग मात्र चार-चार दिवसांचा खंड पडला.  निर्माताही भेटेना.  शूटींग संपल्याचेही सांगेना.  निर्मात्याचे लक्षण काही ठीक दिसत नाही असे चित्रपटाचे कॅमेरामन राघू कर्मकार मला सांगून गेले.  हॉटेलची बिलं वाढत आहेत याची त्यांना काळजी होती.  आपल्याकडे परतीची तिकिटे आहेत तेव्हा आपण सारेजण परतूया नाहीतर हॉटेलवाला बिलापोटी अडवून ठेवील असे ते म्हणाले.  तेव्हा मी त्यांना ठामपणानं सांगितलं की 'दादा, यशवंतराव चव्हाण दिल्लीत आहेत तोपर्यंत आपल्याला घाबरायचं कारण नाही'.  यशवंतरावांनी जनमानसात असा विश्वास संपादन केला होता.

मराठी चित्रपटांना दिल्लीत सरकारी पारितोषिकं मिळाली होती.  बरेच मराठी चित्रपट व्यावसायिक दिल्लीत जमले होते.  सर्वांचा मुक्काम पुना गेस्ट हाऊसमध्ये होता.  त्याचे मालक श्री. बंडोपंत सरपोतदार हे यशवंतरावांचे स्नेही.  त्यांच्यामुळे आम्हाला पंधरा मिनिटे भेटीसाठी वेळ मिळाला.  यशवंतरावांच्या बंगल्यावर पोहोचलो तो सौ. वेणूताई चहाफराळाचं तयार ठेवून वाट पाहत होत्या.  फराळानंतर यशवंतरावांशी दिलखुलास गप्पा रंगल्या.  १५ मिनिटांचा तास कधी होऊन गेला कळलंच नाही.  त्यांचा फार वेळ खर्च होऊ नये म्हणून आम्ही उठण्याची चुळबूळ करीत असू तेव्हा 'बसा हो' म्हणून यशवंतरावच आग्रह करीत राहिले.  सेक्रेटरीची सारखी ये-जा सुरू झाली तेव्हा यशवंतराव मोठ्या नाराजीने उठले आणि पुढच्या भेटीचे आमंत्रण देऊन आम्हाला निरोप दिला.

ते दिल्लीत होते पण महाराष्ट्रातल्या लहानमोठ्या गोष्टींकडे, घटनांकडे त्यांचे लक्ष असायचे.  १९६७ साली माझी आई वारली.  त्यांना ते वर्तमानपत्रातून समजले असावे.  त्वरित यशवंतरावांचे सांत्वनपर पत्र धावून आले.  असा दक्ष आणि जनतेच्या सुखदुःखात धावून येणारा प्रशासक विरळाच !

आक्टोबर (१९८४) मध्ये यशवंतरावांची शेवटचीच भेट.  तीसुद्धा फोनवर.  फोनवर बोलताना सौ. वेणूताईंच्या मृत्यूचा विषय निघाला. पण त्याबाबतीत मी अधिक हळहळ व्यक्त करण्यापूर्वीच त्यांनी माझा भाचा दिलीप याच्या अकाली निधनाबद्दल माझे सांत्वन सुरू केले.  रणजित देसाई आणि सौ. माधवी देसाई यांच्याकडून त्यांना माझ्या भाच्याच्या निधनाचे समजले होते.  मोठ्या भावाने धाकट्या भावाला धाकाने सांगावे तसे ते मला प्रकृती सांभाळण्यासाठी सांगत होते.  'तुम्ही महाराष्ट्राची खूप सेवा केली आहे, आता स्वतःला सांभाळा' असं म्हणाले.

मला मात्र संकोचाने शब्दही बोलायला सुचत नव्हता.  'मी कसली सेवा केली आहे ?'  असं म्हणताच ते एकदम उद्‍गारले, ''अहो, आपली आई, बहीण किंवा वहिनी असावी तर तुमच्यासारखी असं एका चित्रपट अभिनेत्रीबद्दल वाटायला लावणे ही काय समाजाची कमी सेवा आहे !''

इतक्या श्रेष्ठ दर्जाच्या विचारवंताकडून प्रशस्ती ऐकत असताना जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं !

- सुलोचना (अभिनेत्री)

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com