अर्थात संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे सारे श्रेय यशवंतरावांकडेच जाते असे मला म्हणावयाचे नाही. जनतेच्या प्रक्षुब्ध भावना, अनेक नेत्यांची धीरोदात्तता आणि हुतात्म्यांचे बलिदान यांच्या पायावर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन उभे राहिले. पण यशवंतरावांनी ज्या संयमपूर्ण आचाराने व आपल्या गुणांच्या दर्शनाने या लढ्याला कलाटणी दिली तिच्याशिवाय हे स्वप्न साकार झाले नसते असे मात्र म्हणणे भाग आहे. यशवंतराव यांचे वैशिष्ट्य असे की ते भावनावेगाबरोबर वाहवत जात नसत. विचारांचा बांध घालून ते प्रत्येक परिस्थितीतून कौशल्याने मार्ग काढत. विचारीपणाने त्यांनी संयुक्त महाराष्ट्र संपादन केला. पण त्यानंतर विरोधकांशी विचारविनिमय करण्याची, जनतेला विश्वासात घेण्याची, साहित्य, कला वगैरे क्षेत्रांतील गुणीजनांचा आदर करण्याची आणि बहुजनसमाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची वगैरे जी त्यांनी पावले टाकली त्यांतून त्यांच्या प्रज्ञेची जशी ग्वाही मिळाली त्याचप्रमाणे त्यांच्या राजनीतीतील नैपुण्याचीही साक्ष पटून आली. यशवंतरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जे यश मिळविले त्याची कल्पना करावयाची झाली तर नेहरूंच्या नंतर कोण असा प्रश्न विचारला जात असताना भारताचे भावी पंतप्रधान होण्याची योग्यता यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये आहे असे गौरवोद्गार जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या श्रेष्ठ नेत्याने काढले होते असा निर्वाळा देता येईल.
यशवंतरावांनी हे जे कर्तृत्व गाजविले त्याला त्यांच्यामधील गुण जसे कारणीभूत झाले आहेत त्याप्रमाणे त्यांच्या सामाजिक विचारसरणीचाही त्यात बराच मोठा वाटा आहे. ज्या काळात ते राजकारणात आले तो गांधीयुगाचा काळ होता हे तर वर म्हटलेच आहे. गांधीजींनी सारा समाज खडबडून जागा केला आणि पूर्वी जे कधीही काँग्रेसमध्ये नव्हते त्या बहुजनसमाजातील लोकांना गांधीजींनी आकर्षित केले. गांधीजींचा राजकारणात प्रभाव पडण्यापूर्वी काँग्रेह ही ब्राह्मणांच्या म्हणा किंवा पांढरपेशा वर्गाच्या नियंत्रणाखाली होती. टिळकांचे जे अनुयायी काँग्रेसमध्ये होते त्यांना गांधीजींची असहकारिता किंवा सत्याग्रहाचे तत्त्व मान्य नव्हते. त्यांनी प्रतियोगी सहकारितेचे एक तत्त्व असहकारितेविरुद्ध म्हणून पुढे केले. कालांतराने या गटाने काँग्रेसचा त्याग केला आणि लोकशाही स्वराज्य पक्षाची स्थापना केली. या गटाचा महाराष्ट्र काँग्रेसवर इतका पगडा होता की त्यांच्यावर हल्ला चढविताना मोतीलाल नेहरू यांनी कडाडून म्हटले होते, "Congress is not going to be the hand-maid of Maharashtra" पुढे शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ वगैरे पुढार्यांनी गांधीवादाची ध्वजा आपल्या हाती घेतली आणि त्यानंतरच्या जनआंदोलनात बहुजनसमाज हिरीरीने पुढे सरसावला. बहुजनसमाजात बहुशः ब्राह्मणेतरांचाच समावेश होता आणि त्याचे नैसर्गिक पुढारी केशवराव जेधे, शंकरराव मोरे वगैरे मंडळी होती. केशवराव जेधे हे एक मातबर तसेच मनस्वी नेतृत्व होते. त्यांचे निवासस्थान असलेले जेधे मॅन्शन हे एकेवेळी ब्राह्मणेतर चळवळीचे केंद्र होते तसेच ते पुढे काँग्रेसचे केंद्र झाले.
जेधे मॅन्शनला एकेवेळी एवढे महत्त्व होते की रॉय हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रथम जेव्हा पुण्याला आले तेव्हा जेधे मॅन्शनमध्ये आपली सभा घेण्याची त्यांनी आवर्जून सूचना केली. रॉय यांचा कल बहुजनसमाजाकडे कसा झुकलेला होता याचे हे एक प्रसादचिन्हच मानता येईल. नाहीतरी 'India in Transition' या आपल्या पुस्तकात त्यांनी टिळकांचे ध्येयधोरण प्रतिगामी आहे असेच म्हटले होते. मॉस्कोमधे आणि त्यापूर्वी अमेरिकेतील ग्रंथालयात त्यांनी जे मूलगामी वाचन केले होते त्यातून त्यांच्या विचारांची दिशा अशी बदली होती की राजकारणात जहालमतवादी त्याचप्रमाणे समजकारणात पुरोगामी अशी मानता येईल. रॉय यांचा सिद्धान्तच असा होता की, स्वातंत्र्यात जर आशय आणावयाचा असेल तर भारतात तत्त्वज्ञानात्मक क्रांतीही घडवून आणावी लागेल. ही क्रांती समाजपरिवर्तनाची क्रांती व्हावी हीच रॉय यांची आकांक्षा होती.
या आकांक्षेला साथ देण्याचे प्रत्यक्ष कार्य यशवंतरावांनीच महाराष्ट्रात प्रामुख्याने केले. यशवंतराव यांना समाजप्रबोधनाचे बाळकडू पाजणार्या नेत्यांमधे महात्मा जोतीराव फुले, कोल्हापूरचे शाहू महाराज यांना अग्रेसरत्व द्यावे लागेल. यशवंतराव कॉलेजच्या शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये राहिले होते. त्या वेळी शाहू महाराजांच्या समाजकारणाचे त्यांना दर्शन होणे अपरिहार्य होते. बहुजनसमाजाच्या शिक्षणाला खरी चालना दिली ती शाहूमहाराजांनीच होय. त्याकरता प्रत्येक समाजासाठी त्यांनी वसतिगृहे निर्माण केली आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्पृश्यांना आपला दरबार खुला करण्याचे महत्कार्य शाहूमहाराजांनीच प्रत्यक्षपणे करून दाखविले. जोतीबा फुले यांनी तर सत्यशोधक समाज स्थापर करून समाजपरिवत्रनाची एक प्रचंड लाट समाजामध्ये निर्माण केली. यशवंतरावांनी राजकीय दृष्टिकोण गांधी, नेहरू, रॉय यांच्याकडून स्वीकारला तर सामाजिक दृष्टिकोण जोतीबा फुले, शाहूमहाराज, भाऊराव पाटील, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे या द्रष्ट्या समाजसुधारकांकडून घेतला. साहजिकच यशवंतरावांची स्फूर्तिस्थाने उज्ज्वल असल्यामुळे भावी काळात जेव्हा सत्ता त्यांच्या हाती आली तेव्हा इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांनी समाजहिताची कार्ये जितकी वेगाने केली तितकीच हेतुपूर्वक पार पाडली.



















































































































