पण ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना प्रमुख प्रशासकीय होते व महाराष्ट्र काँग्रेसचे सर्वश्रेष्ठ पुढारीही होते. त्यामुळे त्यांचे हे दोन्ही गुण लोकांपुढे आले होते. दिल्लीच्या त्यांच्या वास्तव्यात प्रशासकीय कौशल्याची चमक त्यांनी काही प्रमाणात संरक्षण खात्यात व प्रामुख्याने पुढे गृहखात्यात दाखवली होती. पण राजकीय नेतृत्वाच्या दृष्टीने त्यांची कर्तृत्व व परिणामकारकता उपेक्षणीय होती. बंगलोरच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत १९६९ मध्ये प्रथम राजकीय नेतृत्व देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्या नेत्यांशी त्यांचे कधीच पटले नाही त्या सिंडिकेटला व मोरारजीभाईंना त्यांनी साथ दिली. गिरी निवडून आल्यानंतर काँग्रेस ऐक्याच्या नावाखाली त्यांनी इंदिरा गांधींशी तडजोड केली. त्यामुळे त्यांच्यावर धरसोडीचा आरोप करण्यात येऊ लागला. काँग्रेस अंतर्गत संघर्षात कोण विजयी होणार यासंबंधीचा त्यांचा कयास चुकला म्हणून म्हण अथवा आपला राजकीय वकूब वेळीच न ओळखल्यामुळे त्यांच्याकडून ही चूक झाली.
गुलझारीलाल नंदा यांची गृहमंत्री म्हणून कारकीर्द संपूर्णपणे अयशस्वी ठरली होती. मार्क्सवादी कम्युनिस्टांविरुद्ध त्यांनी योजलेल्या दडपशाही उपायांमुळे ते बरेच बदनाम झाले. या उपायांचे त्यांनी केलेले समर्थनदेखील आचरटपणाचे असे. साधूंच्या निदर्शनाच्या प्रकरणात अश्रुधूर, गोळीबार आदी जे प्रकार झाले त्यामुळे नंदांची पक्की नाचक्की झाली. गृहमंत्री बदलणे तर आवश्यक होऊन बसले होते. नवे गृहमंत्री कोण होणार, स.का.पाटील की यशवंतराव, अशी चर्चा संसदेच्या लॉबीत चालू होती. पण इंदिरा गांधींनी यशवंतरावांची गृहमंत्रिपदासाठी निवड केली. तेथून तिसरा अध्याय सुरू झाला.
माझ्या मते १९६७ व १९६८ ही दोन वर्षे स्वतंत्र भारताच्या राजकारणातील क्रांतिकारक वर्षे होती. आपल्या राजकीय पद्धतीत एक प्रकारचा अननुभूत समतोल या वर्षात निर्माण झाला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात कोणीही डोईजड नव्हते. इंदिरा गांधींच्या सत्तेवर मोरारजी व चव्हाण यांचे बंधन होते. काँग्रेस पार्टीची अमर्याद सत्ता व दोनतृतीयांश बहुमत तेव्हा संपुष्टात आले होते. अनेक राज्यांत बिगर काँग्रेस मंत्रिमंडळे होती. केंद्र राज्य संबंधात एक नवीन प्रकारचा समतोल उत्पन्न झाला होता. आमच्या सहकार्याशिवाय घटनादुरुस्ती करणे काँग्रेसला अशक्य होते. काँग्रेस पक्ष संघटना व प्रशासन यामध्येही एक मजेदार समतोल होता. इंदिरा गांधी काँग्रेस सरकारच्या पंतप्रधान होत्या हे खरे, पण त्यांना काँगेस संघटनेचा शह कामराज यांच्यामुळे बसला होता. लोकसभेत विरोधी पक्ष देखील संख्येने व बुद्धिबळाने मजबूत होते. या संधिकाळात गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हते. पण यशवंतरावांनी ती धुरा उत्तम रीतीने सांभाळली. हा काळ त्यांच्या मंत्रिपदाचा सुवर्णकाळ होता. त्या वर्षात झालेल्या निरनिराळ्या वादविवादांत यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व खूपच चमकले. आयाराम-गयाराम हा शब्दप्रयोग त्यांनीच लोकप्रिय केला होता. विरोधी पक्षाच्या भडिमाराला शांतपणे, उत्तेजित न होता ते उत्तर देत. अडचणीचे प्रश्न ते शिताफीने टाळीत.
पण १९६९ च्या काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर सर्वच बदलले. यशवंतरावांच्या जीवनाचा चौथा दुर्दैवी अध्याय सुरू झाला. एक प्रकारे त्यांच्या जीवनाला उतरती कळा लागली. त्याचे मुख्य कारण यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही लक्षणीय उणिवा होत्या. एक म्हणजे त्यांची अनिर्णयाची अवस्था. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचेजवळ राजकीय विरोधी पक्षनेत्यास आवश्यक असलेली प्रदीर्घ वनवासात जाण्याची तयारी व आक्रमकता नव्हती. यशवंतरावांचे एकूण व्यक्तिमत्त्व सौम्य होते. वनवासातील परिश्रम व कठोर निर्णय घेण्याची तयारी या गोष्टी त्यांना मानवणार्या नव्हत्या. तिसरी उणीव म्हणजे राजकीय साहस करण्याची त्यांची अक्षमता.
केंद्रीय संसदीय बोर्डाच्या बैठकीत १९६९ साली यशवंतरावांनी सिंडिकेट व मोरारजीभाई यांची बाजू घेऊन संजीव रेड्डींच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे इंदिराजींची इतराजी त्यांच्यावर झाली. पंतप्रधानपदासाठी १९६६ साली त्यांनी मोरारजीभाईंना पाठिंबा न देता इंदिराबाईंना आपला पाठिंबा दिला होता. पण तीन वर्षांनंतर राष्ट्रपतींच्या निवडणुकीत त्यांनी आपला पवित्रा बदलला. कारण श्रीमती इंदिरा गांधींच्या बरोबर दोन हात करायची त्यांची तयारी नव्हती.
बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, गिरींचा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील विजय इत्यादी नेत्रदीपक घटनांमुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता अतोनात वाढली आहे, हे निदर्शनाला येताच यशवंतरावांनी परत आपले धोरण बदलले.



















































































































