व्याख्यानमाला-१९७६-१८

तुम्हांला ठाऊक असेल की पारतंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील सगळ्या नेत्यांनी ज्या एका भावनेच्या आधारावर या देशातला समाज एकवटला, संघटित केला त्यातली मूळ प्रेरणा राष्ट्रीयत्त्वाची होती.

राष्ट्रीयभावनेला वेगवेगळ्या प्रकारचा विचारस्पर्श -  नव्या राजकिय विचारांचे, नव्या वादांचे, बुध्दिनिष्ठेचे, व्यक्ति स्वातंत्र्याचे, असे वेगवेगळे स्पर्श देऊन ती राष्ट्रीय भावना आधिक प्रखर करून त्या राष्ट्रभावनेच्या जोरावर सबंध इंग्रजी साम्राज्याविरूध्द उभे राहण्याची एक जिद्द त्या वेळेला आपल्या समाजाने दाखविली आणि स्वातंत्र्य पदरात पाडून घेतलं. ही राष्ट्रीयत्वाची भावना राष्ट्राच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची असते आणि मी जर असं म्हटलं की नंतरच्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा जर कशाचा आला असेल तर या राष्ट्रीय भावनेचा हळू हळू होत गेलेला –हास, तर हे अतिशयोक्तिचं होणार नाही. राष्ट्रीयत्वाची कल्पना ही निश्चित काय कल्पना आहे ? राष्ट्र हे काही सरहद्दीवरून ठरत नाही. कदाचित माझं हे विधान तुम्हाला चमत्कारिक वाटेल. जगाच्या इतिहासामध्ये सगळ्या राष्ट्राच्या सरहद्दी कालानुक्रमे बदलत आलेल्या आहेत. भारताचा देखील प्राचीन नकाशा पाहिला, मध्ययुगीन कालातला नकाशा पाहिला, आजचा नकाशा पाहिला, तर एकच सरहद्दी त्यांत नाहीत. त्या सतत बदलत आलेल्या आहेत.  तुम्हांला आणखी असे दिसेल की कांही विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट अशा संस्कृतीच्या नावानेच राष्ट्र ओळखले जाते, असा एक जमाना होता. ते ते  राष्ट्र त्या त्या धर्माने त्या त्या संस्कृतीने ओळखले जात होते. परंतु युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाली, युरोपामध्ये विज्ञान निष्ठा आली, युरोपामध्ये धर्माची चौकट गळून पडली, युरोपामध्ये अंधश्रध्देचं प्राबल्य कमी झालं आणि नव्या वैज्ञानिक शोधाने जग अत्यंत जवळ येत चाललं ते इतकं जवळ आलं की आता दुस-यापासून आपण वेगळे आहोत असं मानण्याची जर कुणी इच्छा प्रदर्शित केली असती तर तो मूर्ख ठरला असता. आणि म्हणून जवळ आलेल्या जगामध्ये एकमेकांना दूर करणारे जे घटक होते ते पहिल्यांदा जगाच्या सगळ्या तत्त्वज्ञानातून बाहेर फेकले गेले. आणि विशिष्ट संस्कृती, एक विशिष्ट धर्म, एक विशिष्ट पंथ, एक विशिष्ट जात यांच्यावरती आधारलेली राष्ट्रकल्पना नंतर कुठेच राहिली नाही. राष्ट्राच्या कल्पनेला वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत. आपल्याकडेसुध्दा तुम्हाला असे दिसेल आपण ज्या वेळेला भारत राष्ट्र असे म्हणतो तेव्हा काही तरी विशिष्ट सरहद्दीमध्ये जरी आपण तो नकाशा रूपाने पहात असलो तरी देखील काही विशिष्ट गट, समूह, भाषा, विशिष्ट संस्कृती, विशिष्ट धर्म या अर्थाने आपण राष्ट्राकडे आज पहात नाही. तर या राष्ट्रामध्ये या राष्ट्रावर प्रेम करणारा, राष्ट्र आपलं म्हणणारा, आणि या राष्ट्राच्या अभ्युद्यासाठी आपलं सर्वस्व वेचण्याची प्रतिज्ञा घेणारा आणि त्यासाठी राबणारा जो जो घटक असेल तो या राष्ट्राचा घटक ठरतो. अशी जी राष्ट्रीयत्वाची कल्पना, त्या राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेचा जेवढा प्रचार आणि प्रसार बीजारोपण आणि त्याचे वृक्षामध्ये रूपांतर, स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये व्हायला हवं होत तितक झालेलं नाही. हे स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या निरनिराळ्या चळवळी, भाषिक चळवळी, प्रांतिक चळवळी, जातीय चळवळी, धार्मिक चळवळी यांचा जरा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल. इथे अनेक प्रकारच्या दंगली होतात त्या वेळी आपण एक राष्ट्राचे पुत्र आहोत हे विसरतो. कुठल्यातरी क्षुद्र कारणावरून, सकुंचित कारणावरून, संकुचित प्रश्नावरून आपण आपआपसांत भांडून आपली इतकी शक्ती खर्च केलेली आहे की, तेवढी शक्ती जर आपण राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये लावली असती तर माझी अशी खात्री आहे की आज आपण जी प्रगती साधली त्याहून कितीतरी आधिक त्या काळातच प्रगती साधाली असती. नद्यांच्या पाण्यावरून भांडणे, प्रदेशांच्या सीमेवरून भांडणे, जातीच्या एकमेकांच्या वर्ण श्रेष्ठत्वाच्यावरून भांडण, धर्माच्या कुठल्यातरी क्षुद्र अशा प्रकारच्या कलहावरून भांडणं, असं जे स्वरुप आपल्याला सतत दिसत गेलं-गेल्या २०-२५ वर्षामध्ये – त्यामध्ये आपल्या राष्ट्राची बरीचशी शक्ती खर्च झाली. आज एक अशी वेळ आलेली आहे की एक राष्ट्र म्हणून आज जर आपणं उभं राहिलो, आणि राष्ट्राचा एक दिलाने, एक मानाने, एक विचाराने विचार केला तर जे अनेक प्रश्न होते व आहेत त्या प्रश्नांची उत्तरे सांपडतील. आणि उत्तरे सांपडली की प्रगती करणं सोपं जातं आणि आपली प्रगती अधिक गतीने होईल म्हणून माझ्या भाषणामध्ये किंवा व्याख्यानाच्या विषयामध्ये ‘वेग’ हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com