वास्तविक पाहता बख्शिदाबक्ष हे सिंहगडाला औरंगजेबाने दिलेले नाव जुल्फिकारखान नुसरतजंग याने हा गड पुन्हा जिंकला. जदुनाथांनी ‘ रिक्याप्चर ’ असा इंग्रजी शब्द वापरला आहे. परंतु बेन्द्रे यांच्या अनुवादात बख्शिंदाबख्श हा किल्ला बक्षेन्द्र बक्षी नावाचा माणूस झाला आणि नुसरतजंगाने या व्यक्तीस पुन्हा पकडले या प्रकारे बेन्द्रे यांनी भाषांतर केलेले आहे. हे इंग्रजीचे मराठी भाषांतर करतांना झालेले घोटाळे आहेत. परंतु इंग्रजी लेखकांनी ज्या विविध भाषातील साधनांवरून आपल्या ऐतिहासिक घटना शोधलेल्या असतात त्या भाषांमधील शब्दांचे योग्य भाषांतर केलेले असते काय ? जर मूळ इंग्रजी भाषांतरच चूक असेल तर त्याचा आधार घेणारेही चुकणारच छत्रपती संभाजी महाराज या ग्रंथाच्या पृ. २३६ वर बेन्द्रे यांनीच इ. स. १६८२ मध्ये मोगलांनी रामसेजच्या किल्ल्याला वेढा घातला त्याचा मजकूर दिला आहे तो असा, “ नंतर काही दिवसांनी एके दिवशी खानजहान बहादूरच्या पागेतील मोतद्दाराने काही जादूटोणा करून किल्ला घेऊन देतो म्हणून सांगितले. त्या म्हणण्याप्रमाणे बहादूरखानाने त्यांस शंभर तोळे सोन्याचा एक नाग करून दिला. तो घेऊन तो गड चढू लागला इतक्यात किल्ल्यावरून रेशमाचा चेंडू आला व त्याच्या छातीत जोराने बसला व त्याच्या जवळील नाग घेऊन गेला. ” हे वर्णन मूळ फारशी भाषेत आहे. त्याचे मूळ इंग्रजी भाषांतरच चुकलेले आहे. मूळ फारशी मजकूरात रेसमान म्हणजे दोर असा शब्द आहे. इंग्रजी भाषांतरकारांनी रेसमान या शब्दाचे भाषांतर दोर असे न करता रेशिम असे केले आहे. ख्वाफीखान या फारशी इतिहासकाराला मराठ्यांनी गोफणाचा मारा केला असे म्हणावयाचे आहे. गोफणातून दगड आला तो मोतद्दाराच्या छातीत आदळला त्यामुळे त्याच्या हातात असलेला सोन्याचा नाग घेऊन जाणे, असा विनोद निर्माण झालेला आहे.
आपले श्रेष्ठ इतिहासकार जदुनाथांच्या कडूनही असे घडले आहे. संभाजीराजे संगमेश्वर येथे मोगलांच्या हाती सापडले यासंबंधी लिहितांना मासिरे अलमगीरीचा कर्ता हा अलंकारीक भाषा वापरतो. तो म्हणतो “ कोल्ह्याच्या वृत्तीचा तो ( म्हणजे संभाजी ) कवि कलशाच्या हवेलीरूपी भोकात म्हणजे बिळात लपला ” जदुनाथांनी इंग्रजी भाषांतर केले ते असे “संभाजी हा कवी कलशाच्या वाड्यात एक भोक होते त्यात लपला ” आता भोक म्हणजे काय हा आपल्या इतिहासाभ्यासकांना प्रश्न पडला त्यांनी वाड्यातील भोक म्हणजे तळघर, पेव, बळद असे अर्थ घेऊन संभाजी राजे हे तळघरात किंवा पेवात अगर बळदात लपून बसले असा अर्थ काढला. दुस-या एका अनुवादातही जदुनाथांच्याकडून असेच घडले. मराठ्यांचे किल्ले घेत औरंगजेब फिरत होता. त्याकाळात मोगलांचे अतिशय हाल झाले. असंख्य असे मोगल सैनिक सर्वस्वाला मुकून इतस्तत:भटकू लागले. या संबंधात जो फारसी वाक्यप्रचार आहे तो म्हणजे आपले सामान कोंबड्यावर लादणे असा आहे. कोंबड्याची पाठ ती काय आणि तिच्यावर सामान किती लादणार ? म्हणजेच त्या माणसापाशी काहीच राहिले नाही असा अर्थ घ्यावयाचा. पण जदुनाथांनी त्या वाक्याचे शब्दश: भाषांतर केले. मूळ ग्रंथातील ‘ लोक भटके बनले ’ या वाक्याचा अर्थ जदुनाथानी असा घेतला की ‘ मोगल सैन्यात भटक्या जमाती म्हणजे जिप्सी जमाती होत्या ’ आणि पुढे लिहिले की “ सैन्यातील जिप्सींनी आपले सामान आपल्या कोंबड्यावर लादले.” काय सांगावे उद्या एखादा इतिहासकार या जिप्सींच्या शोधास निघू शकेल. अशा चुका राजवाडे आणि शेजवलकरांच्याकडून सुध्दा झालेल्या आहेत. त्यांची अधिक माहीती देण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही.
आपण ही उदाहरणे याच्यासाठी घेंतली की, इतिहास लेखक जुन्या कागदपत्रावरून ज्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी करीत असतो त्या तो आपल्या मनाप्रमाणे करीत असतो आणि त्यांचा अर्थ तो आपल्या मगदूराप्रमाणे लावीत असतो.



















































































































