व्याख्यानमाला-१९८९-४३

स्त्रियांची स्थिती आणखी हलाखीची आहे. त्यांच्याकडे आजही मानवी व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जात नाही. मुलं निर्माण करणार शेत म्हणून, पुरुषांच्या उपभोगाची दासी म्हणून, त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. हुंड्यासाठी आमच्या तरुण मुलींना जाळलं जातं, आमच्या देशातील स्त्रियांना आपले संसार थाटण्यासाठी पुरुष नावाच्या शरीराला विकत घ्याव लागतं. हा आमच्या महान संस्कृतीचा दर्जा आहे. गर्भजल परीक्षा आल्यामुळं आमच्या मुलींना आता लग्न होईपर्यंत सुद्धा जगू द्यायची इच्छा नाही. ती गर्भामध्येच असताना गर्भजल परीक्षा करुन गर्भपात करायचा हे नवं शास्त्र आमच्या पुरुषप्रधान संस्कृतीला सापडलेलं आहे. केवळ बंदी आणून जमणार नाही तर स्त्री पुरुषाचे प्रबोधन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.

स्त्री पुरुषासंबंधी बोलतांना जोतिराव फुले म्हणतात, "याचे कारण, निर्मीकाने निर्माण केलेल्या चमत्कारीक मोह उत्पन्न करणा-या भवसागरात तरंगून मजा मारणारे क्षणिक उभयंता मानवप्राणी आहेत. त्यातून स्वभावेकरुन स्त्रीची जात भिडस्त असल्यामुळे ती प्रथम एका पुरुषात सलगी करण्यास सवड देते. आणि ती सलगी हा कामार्थी पुरुष इतका वाढवितो की, अखेरीस स्त्री स्वत: होऊन त्यास आपला मदतगार, वाटेकरी, सखा करिते, आणि तीच सृष्टी नियमांस अनुसरून आपल्यातील सर्व मुलांचे तर काय, परंतु आर्यभटांतील नाडबंद ब्रह्मचारी शंकराचार्यांच्या तोलाच्या मुलांचेसुद्धा आपल्या उदरी कांकू केल्याशिवाय निमूटपणे नवमास रात्रदिवस सतत ओझे वागविते. तीच आपल्या सर्वास जन्म देणारी होय. आपले मलमूत्रादि काढून आपल्या सर्वांचे लालन व पाल करुन आपल्या सर्वाचा परामर्ष करणारी होय. आपण सर्व पंगू लाचार असता सर्वकाळ आपली काळजी वाहते व तिनेच आपणा सर्वांस चालावयास व बोलावयास शिकवले. यावरुन एकंदर आबाल वृद्धात म्हण पडली आहे की, सर्वाचे उपकार फिटतील परंतु आपल्या जन्मदात्या मातोश्रीचे उपकार फिटणार नाहीत. यावरुन नि:संशय पुरुषांपेक्षा स्त्री माझ्या मते श्रेष्ठ आहे."

ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र योजना करण्याची आवश्यकता आहे.  शेतक-यांच्या मुलामुलींना शिष्यवृत्त्या देणे, ग्रामीण मुला-मुलींसाठी नोक-यामध्ये राखीव जागा ठेवणे. ग्रामीण नियोजनाशी निगडीत अभ्यासक्रम तयार करणे. ग्रामीण मुलां-मुलींचे साठी वसतीगृहे बांधणे, नवीन ज्ञान विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या सांस्कृतिक पर्यावरणाची निर्मिती त्यांच्यासाठी उपलब्ध करुन देणे, त्यासाठी शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करणे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती हीकी, जोतिराव फुले हे स्त्री शिक्षणाचे, शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाचे, आणि मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार करणारे पहिले भारतीय शिक्षणतज्ञ आहेत.

म. जोतिराव फुल्यांचा 'शेतक-याचा आसूड' घेऊन शेतकरी संघटनेचे नेते आपणच त्यांचे वारसदार आहोत असं सोंग घेऊन सध्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. निदान शेतीमालाच्या प्रश्नावर शेतक-यात ते जागृती करीत आहेत.  हो गोष्ट अभिनंदनीय आहे असं मी तरी मानतो. पण त्यांच्या शेतक-यांच्या प्रश्नाविषयी असलेला जिव्हाळा हा पुतना-मावशीच्या उमाळयासारखा आहे हे मी आपणाला नम्रपणे सांगू इच्छितो. ते नेते चातुर्वर्ण्याबद्दल बोलत नाहीत. हिंदुत्वाच्या पुनर्जीवनाबद्दल बोलत नाहीत. जातिभेद अस्पृश्यता यासंबधीही चकार शब्द काढत नाहीत. मी वर सांगितलेल्या सर्व प्रकाराबद्दल ते गप्प आहेत. मग ते कसले आहेत जोतिराव फुल्यांचे वारसदार. सत्तेवर जाणारनाही असं बोलत  बोलत, राजकारणात गेलो तर खेटराने मारा असे सांगणारे हे नेते राजकारणातील नवे दलाल, जोतिराव फुल्यांचा शेतक-यांचा आसूड शेतक-यांच्याच पाठीत मारणारं राजकारण करीत आहोत. वरकरणी कळवळा दाखवीत आहेत.

आज देशभर जातीयवादाचा धुमाकूळ चालू आहे तीन टक्के असलेली ब्राह्मण वर्ग ६२ टक्के सार्वजनिक क्षेत्रामधील नोक-यामध्ये मांड ठोकून बसलेला  आहे. चातुर्वर्ण्यांच पुनरुज्जीवन स्वातंत्र्याच्या नावाखाली छुप्या पावलानं केलं जात आहे. गरीब समाजाचे सामाजिक आणि आर्थिक शत्रू आपापल्या मक्तेदा-या टिकवून ठेवणारं राजकारण लोकांच्या हिताची भाषा वापरीत, करत आहेत, "गर्व से कहो हम हिंदू है." हा नवा हिंद. "फ्यूरर" महाराष्ट्राच्या क्रांतिकारक मातीत वाढत आहे. भारतीय स्वातंत्र्याला श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी भगवं ग्रहण लावलेलं आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या समाजाला शंभर वर्षे पुढे नेणारा विचार मांडला तर त्यांचे हे दिवटे चिरंजीव महाराष्ट्रातील समाजाला बाराव्या शतकात घेऊन जात आहेत. छत्रपतींना खिशात घालून महाराष्ट्राचे आम्ही छत्रपती होऊ हा फुकाचा, अभिमान ते बाळगून आहेत. विरोधी पक्षांच्या अपयशी पाठीवर  आलेली ही फुटकुळी आहे. येत्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ती फुटणार आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com