न्याय अन्यायाची व्याख्या काय? कोणाला न्याय द्यायचा? कोणावरती अन्याय करायचा? आणि कोणावर तरी अन्याय करून कोणालातरी न्याय द्यायचा याला काय म्हणायचं? मूठभरांच्या हितसंबंधासाठी आणि श्रेष्ठींच्या स्वार्थासाठी, अभिजनांच्या हितासाठी जेव्हा जनसामान्यांचा बळी दिला जातो. याल आपण न्याय-अन्यायाच्या काय कसोट्या लावणार लावणार आहोत? तेव्हा विकासाच्या क्रमामध्ये आपल्याला न्याय-अन्यायाचीसुद्धा परिभाषा पुन्हा एकदा करून घ्यावी लागेल. विकासाचं असं प्रतिमान आम्हाला पाहिजे की ज्याच्यामध्ये सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, ज्याच्यामुळे सर्वांना लाभ मिळाला पाहिजे. मूठभरांच्या लाभासाठी बहुसंख्यांचा बळी देणं आता बस झालं. योग्य जीवनप्रणाली म्हणजे काय हे आपल्याला ठरवावं लागेल. त्यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? त्या कोणाकोणाला मिळणार आहेत? म्हणजे आम्हाला जी विकासनीती पाहिजे ती अशी असावी की योग्य जीवनप्रणाली सगळ्यांना शक्य व्हावी, प्राप्त व्हावी.
त्यामुळे एकापरीने सरदार सरोवराचा लढा सत्तामत्ताधारकांच्या विरोधात सामाजिक न्यायासाठी उठलेल्या लोकशक्तीचा लढा आहे. या लढ्याची मी जी आवर्जून भलावण करतोय ती केवळ आकडेवारीच्या हिशेबाने, त्यांनी सांगितलेले लाभांचे आणि नुकसानीचे आकडे आम्हाला पटले म्हणून नाही तर यासाठी की या लढ्याने आमच्या सगळ्या विकासक्रमाला आव्हानित केलेलं आहे. तुम्ही ज्याला विकास, विकास किंवा प्रगती म्हणता आहात ती ख-या अर्थाने प्रगती आहे काय? विचार करा. १९७० नंतर या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आजच्या विकासप्रतिमानाला आव्हानित करणारे लढे ठिकठिकाणी सुरू झालेले आहेत. युवकांचे अनेक लढे आहेत. बेकारांचे अनेक लढं आहेत. भूमिहीन मजुरांचे अनेक लढे आहेत. आणि काल सांगितल्याप्रमाणे त्यांच्याशी वागताना एकच भाषा राज्यकर्त्यांना समजते ती म्हणजे दडपशाहीची! हे लढे असे दडपशाहीने दाबले जाणार नाहीत, कारण हे लढे लोकांचे लढे आहेत. लोकांच्या मागण्यांभोवती उभे राहिलेले लढे आहेत. आणि या लोकांच्या मागण्या म्हणजे अमुक आमच्या पदरात घाला असं दाता-याचक संबंधातून निर्माण होणा-या मागण्या नाहीत, त्यात भिकारचोटपणा नाही. तर लोक असं म्हणतात की आमच्या हक्कांसाठी आम्ही उबे राहिलेले आहोत. आणि आमचे हक्क पूर्ण करण्याची ताकद तुमच्या या विकास प्रतिमानामध्ये नाही. ते बदला. आजपर्यत तुम्ही जी स्वतःची आणि इतरांचीसुद्धा फसवणुक करून घेतली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आमची फसवणूक केलेली आहे, ती आम्ही यापुढे सहन करणार नाही.



















































































































