आधुनिकतेचा अर्थ काय? आधुनिकतेचा अर्थ कॉम्प्यूटर नव्हे. आधुनिकतेचा अर्थ म्हणजे असंच कुणीतरी आपल्याला मस्तकी मारलेलं तंत्रज्ञान नव्हे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थ असा की ज्याचा वापर करताना आजच्य काळाच्या संदर्भात पिरष्कृत करून घेतलेलं पारंपारिक तंत्रज्ञान, समजा चरख्याला वीच वापरून त्याची गती वाढवली, तर गांधींचा त्याला काही विरोध असण्याचं कारण नाही. मानवी हाताची ताकद वाढवण्याचं ते तंत्रज्ञान ठरेल. त्यामुळे ते तंत्रज्ञान आधुनिकच आहे. समुचित तंत्रज्ञान हे आधुनिक तंत्रज्ञान असतं. ते मागासलेलं. जुनाट किंवा कालबाह्य झालेलं तंत्रज्ञान नसतं हे आपण लक्षात ठेवा. त्या तंत्रज्ञानाचा आजच्या सामाजिक जीवनामध्ये व आजच्या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी वापर केला जाऊ शकतो आणि त्यादृष्टीने ते योग्य आहे की नाही हा निकष महत्वाचा आहे. त्याची ती योग्यता कशाच्या आधाराने ठरवावयाची? एकतर ते स्थानिक असावं. स्थानिक असणारं तंत्रज्ञान सगळ्यांना सहज उपलब्ध असतं, स्थानिक गरजांची परिपूर्ती करू शकतं, स्थानिक साधनसामग्रीवरीत अवलंबून असतं. त्यामुळे ते अनुरूप असं ठरतं. आयात केलेलं नव्हे. जपानच्या व इस्त्राइलच्या मोठेपणाबद्दल बोलणारे हे लक्षात घेत नाहीत की त्यांचं तंत्रज्ञान हे समुतिच तंत्रज्ञानाच्या व्याख्येत बसत नाही. ते लोक मोठे झाले अतील, तात्पुरतं मोठं होणं किंवा तात्कालिक लाभ मिळवणं हे विकासाचं गमक नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे एखादा देश आपलं सत्व गहाण टाकून काहीकाळ मोठा होऊ शकतो आणि आकारानं जर लहान असेल तर भरभराटीलासुद्धा येऊ शकतो. जपानचा गुराखी घड्याळे तयार करतो असं आपल्याला सांगितलं जातं. फार कौतुकानं लोक सांगतात की जपानचा गुराखी हा तिथं घड्याळं तयार करतो. पण घड्याळ तयार करणारा गुराखी हा नुरूप तंत्रज्ञानाचा नमुना ठरू शकणार नाही. आपण वर केलेल्या त्याच्या तंत्रज्ञानाला अनुरूप तंत्रज्ञान म्हणता येणार नाही. आयर्विन टॉफ्लर नावाच् माणसानं एक पुस्तक लिहिलंय “थर्ड वेव्ह” नावाचं आणि त्यात स्वतंत्र प्रकरण आहे, त्याचं शीर्षक आहे “गांधी वुइथ सॅटेलाईट”! गांधी वुइथ सॅटेलाईट हे समुचित तंत्रज्ञानाचं उदाहरण असू शकत नाही. लेखकाला असं म्हणायचं की आपण विकेंद्रीकरण घ्यावं, कुटीर उद्योग घ्यावेत, प्रत्येक झोपडीत उद्योग करावेत, खेड्यापाड्यामध्ये औद्योगीकरण करावं. इतं आम्ही विचार अंशतः घेतो. पण उद्योग कोणते सुरू करतो? कॉम्प्युटर जुळवण्याचे, इलेक्ट्रॉनिक यंत्रे तयार करण्याचे, तिकडून परदेशातून किटस् आणायच्या आणि त्यावरून असेंब्लिंग करायचं. वस्तू तयार करायच्या. गांधींच्या भाषेत याला कुटिरोद्योग म्हणता येणार नाही. “गांधी वुइथ सॅटेलाईट”चा हा जो अर्थ की आम्ही इलेक्ट्रॉनिक्सही आणायचं आणि कुटिरोद्योग म्हणून स्थानिक पातळीवर उत्पादनही करायचं. अमूक एक उद्योग केवळ तो खेड्यात सुरू होतो म्हणून त्याला कुटिरोद्योग म्हणायचं. गांधी वुइथ सॅटेलाईट हे काही अनुरूप तंत्रज्ञानाचं उदाहरण होऊ शकत नाही. स्थानिक साधनसामग्रीचा वापर करून स्थानिक माणसाच्या गरजांची परिपूर्ती ज्यात होते आणि ज्या उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो, ज्याचं प्रशिक्षण प्रत्येकजण घेऊ शकतो, हे निकष आहेत समुचित तंत्रज्ञानाचे.



















































































































